पुणे / नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होत आहे.
उन्हाळ्याच्या सुटीसाठी आई-वडिलांसोबत आजोळी आलेल्या चिमुकलीला आरोपीने ङ्गङ्घवासरू दाखवतोफफ असे सांगत गोठ्याकडे नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर पुरावे लपवण्यासाठी आरोपीने मृतदेह गोठ्यातील शेणात पुरल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भीमराव कांबळे (वय ६५, रा. साळवडे, ता. भोर) याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. गावात शोककळा पसरली असून नागरिकांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
या घटनेनंतर पीडित मुलीच्या वडिलांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, माझ्या मुलीला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या घरी येऊ नये. या दरम्यानचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पीडित कुटुंबाच्या या भूमिकेमुळे समाजात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरिकांनी कुटुंबाच्या भावनांना पाठिंबा दर्शवला आहे. नागरिकांकडून आरोपीस फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
चिमुकलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार...
दरम्यान आरोपीला कठोर शिक्षा आणि शासनाकडून ठोस आश्वासनाच्या मागणीसाठी शनिवारी रात्री नसरापूरच्या ग्रामस्थांनी पीडित चिमुकलीचा मृतदेह थेट पुण्यातील नवले पुलावर आणला. या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर आणि लाठीमार करत आंदोलकांना पांगवले, त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोर तालुक्यात आज कडकडीत बंद
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आलाय. नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोर व राजगड तालुक्यात व्यापारी, दुकानदार आणि स्थानिक नागरिकांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व व्यापारी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हा बंद पाळण्यात आलाय.